
खूप खूप माफी! जास्त नाही फक्त ६ महिने उशिरा आहोत आपण या ब्लॉग ला. पूर्णपणे माझी चुकी!! पुढच्या वेळीपासून ज्या दिवशी ब्लॉग लिहिला त्याच दिवशी त्याला पोस्ट करायचा प्रण मी घेईन आणि तो पोस्ट करणारच. या वेळी साठी फक्त माफ करा..
माझं मागचं ७ वर्षापासूनचं असलेलं स्वप्न हे सरत्या वर्षामध्ये पूर्ण झालं. जे लक्ष्य घेऊन मी घराबाहेर पडलो होतो २०१७ साली ते बरोबर ११ महिने आणि २० दिवस आधी साध्य झालं. सगळा अभ्यास, ३-३ परीक्षा, ३ वर्ष office मधलं काम आणि असंख्य आठवणी-अडचणी या सगळ्या पूर्णत्वास आल्या आणि सकारात्मकरित्या त्याचं निकालामध्ये उद्यापन झालं असं मी म्हणेन. मागच्या ८ जानेवारीला office संपवून घरी जात असताना ९ च्या निकालाचे विचार डोक्यात होते पण चिंता वाटत नव्हती. नापास तर नापास, एकदा अभ्यास केलाय अजून एकदा करू त्यात काय, असाच भाव डोक्यात होता. मला वाटतं प्रामाणिक प्रयत्न असतील तर मग आपल्या तयारी मधली थोडी बहुत कसर आपलं भाग्य नक्कीच भरून काढतं.
परिक्षेच्या एका रणांगणातून बाहेर पडलो आणि लगेच आणखी भव्य आणि आव्हानात्मक अशा दुसऱ्या समारात उडी मारली. आधी योग्य नोकरी शोधणं आणि नंतर पूर्णवेळ आपणच उचललेल्या जबाबदाऱ्या पेलणं हेच ते आव्हान. आधी अभ्यास आणि मग परीक्षा अशी सवय लागलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना या नवीन प्रकारच्या सततच्या चाचणीला सामोरं जाणं थोडं अवघड जावू शकतं, पण अशा अवघड गोष्टींना सामोरं गेल्याशिवाय देवपण कसं मिळणार ना! याच सगळ्या परीक्षांना तोंड देत देत माझं हे मागचं वर्ष सरून गेलं.
एक तशी छोटी खंत माझ्या मनात आहे, ती म्हणजे मागच्या वर्षात माझं content ch consumption हे खूपच कमी झालंय. निवडक च movies series बघण्यात आल्या, पण एक नवीन नाद आणि एक आधीच्या च नादाच चांगलं पालन झालंय असं मी म्हणेन. पहिलं म्हणजे नाटक आणि दुसरं म्हणजे पुस्तकवाचन. पुण्यात असताना आर्थिक अंगांकडे बघून कधीही नाटक बघायला ना गेलेलो मी या वर्षी मात्र एकदम धमाकेदार सुरुवात करून ५-६ नाटकं बघितलीत. एक नाटक तर दोन तीन वेळा बघितलंय. आपल्या समोर येऊन कलाकार प्रदर्शन करतात आणि सगळ्या गोष्टी त्या वेळी एकदम योग्यरित्या काम करतात. ह्या सगळ्याचं साक्षीदार होणं हाच एक खूप अद्भुत आणि नवलाईचा विषय आहे.
नव्या वर्षाकडूनच्या अपेक्षांबाबत बोलायचं झालं तर आणखी ज्ञान मिळू दे, कामामध्ये केलेल्या प्रयत्नांना यश मिळू दे आणि एकंदर आयुष्यातल्या केलेल्या निर्णयांना पेलून न्यायची शक्ती आणि बुद्धी दे. भरपूर वेळा भरपूर विचार न करता आपण एका flow मध्ये निवडी करतो. भरपूर वेळा त्या मनासारख्या होतात आणि नाही पण. अशाच निवडी एका पध्दतशीरपणे करता याव्यात मग त्यांना पार पाडत असताना बाकीच्या शंकांना जागाच राहत नाही. अशाच सदसद्विवेकबुद्धीची अपेक्षा करतो. नवीन वर्षात अधिकाधिक नाटकं आणि पुस्तकाचा आस्वाद मी घ्यावा आणि त्याच सोबत ब्लॉग्ज द्वारे ज्ञान आणि अनुभवदानाच काम अविरत सुरू राहावं हीच इच्छा.
भेटू पुढच्या वर्षी! लक्ष्याचा पाठलाग करताना ची चलबिचलता ते एक लक्ष्य प्राप्त करून आलेली नवी चलबिचलता असा माझा प्रवास २०२४ मध्ये झाला, या वर्षी काय होतंय ते बघू. अजून फक्त ३६४ दिवस बाकी राहिलेत (आता तर १८० च).
ता. क.:- या वर्षी माझ्या सोबत भरपूर मित्रांनी हे CA परीक्षेचं शिवधनुष्य सफलतेनं उचललं आणि परीक्षा उत्तीर्ण झाले! खूप खूप शुभेच्छा अमरीश, संदेश, अथर्व, इंद्रजीत, पुष्कर, आर्या, प्रसाद, अभिषेक, प्राजक्ता, तपन, अद्वैत (दोन्ही हं!), मानसी, तुषार (तुला तर AIR साठी डबल शुभेच्छा) आणि अवधूत! एक लक्ष्य पार झालंय अजून भरपूर पार करायचेत!
बोनस ता. क.:- अगदी ३-४ दिवसांमध्ये आपण परत भेटणार आहोत. निमित्त असेल कोहली च्या दैदिप्यमान कारकिर्दीला द्यावयाचा सलाम!
Great Work buddy
LikeLike